ठाणे : डोंबिवली विभागातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील पाच महिन्यांपासून २१ तोळे सोने, ६ कोटीची रोकड ,११ मोबाईल आणि लॅपटॉप, १२ मोटर वाहने, १४ टन सळई तर कल्याण विभागातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस गेले. ४१ लाख ५५ हजार किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने, २२ लाखाची रोकड, चार मोबाईल व लॅपटॉप, ९ मोटर वाहने असा एकूण ७ कोटी ९४ लाख किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून रेझिंग डे निमित्त सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आला.
अटकेसह मालाची वसूली : पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी यामधील ८० टक्केहून अधिक गुन्ह्याचा छडा लावण्यात कल्याण डोंबिवली पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी आरोपी तर अटक केलेच. मात्र, त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात चोरी गेलेला ऐवज आणि दागिनेही हस्तगत केले.
या पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती : यावेळी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान हे सर्व साहित्य संबधित फिर्यादी मूळ मालक असलेल्या नागरिकांना परत देण्यात आले. चोरीस गेलेला माल पुन्हा नागरिकांना परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
हेही वाचा : Mumbai Crime : छोटा राजनचे बॅनर लावत पावती देऊन खंडणी वसूली; 5 जणांना अटक