नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होऊन संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली झाली होती. या संदर्भात व्यापारी वर्गातून तक्रार करण्यात आल्यानंतर मात्र, बाजार समितीच्या माध्यमातून काळजी घेण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी मार्केटचे दोन भागात विभाजन करण्यात आले असून खारघर येथेही एपीएमसीमधील माल उतरवला जात आहे.
संचारबंदीच्या सुरुवातीला ग्रामीण भागातून माल येत नसल्याने शेतकऱ्यांचे काही अंशी नुकसान होत होते. मात्र, आता आवक चांगली होत असल्याने सध्यातरी शेतकऱ्यांचे नुकसान होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आशियातील सर्वात मोठी भाजी बाजारपेठ असणाऱ्या एपीएमसी मार्केटमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. राज्य आणि राज्याबाहेरुन दररोज शेतमालाच्या 1200 ते 1500 गाड्यांची आवक होत असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 300 गाड्यांव्यतिरिक्त एकाही गाडीला प्रवेश दिला जात नाही.
बाजार परिसरात 300 पेक्षा अधिक गाड्यांची आवक झाल्यास त्या गाड्या खारघरमध्ये उभारलेल्या मार्केटमध्ये पाठवण्यात येत आहेत. एपीएमसी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची फोनवरुन ऑर्डर घेऊन माल घरपोच पाठवण्यात येत आहे.