ठाणे - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरील अलिबाग येथे धडकले आहे. या वादळाचा फटका ठाण्यातील खाडीच्या किनारी भागाला देखील बसू शकतो. त्यामुळे ठाण्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचा टीम दाखल झाली आहे.
निसर्ग चक्रीवादळ आज बुधवारी दुपारच्या सुमारास अलिबागच्या किनारपट्टीवर धडकले आहे. तसेच अलिबाग सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा कोकण किनारपट्टीला चांगलाच फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच ठाण्यातील खाडीच्या किनारी देखील या वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये ३० कर्मचारी आणि ३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या पावसात सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थिती याच जवानांनी हाताळली होती. तसेच धुळ्यातील शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीमधील दुर्घटनेत देखील या टीमने बचावकार्य केले होते. अशा सर्व घटनांमधून आतापर्यंत ३८४० लोकांना वाचविण्यात आले आहे. तसेच आता ही टीम ठाण्यात देखील पोहोचली आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जगताप यांनी केले.