ठाणे - डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर बाजूकडील रेल्वे प्रवेशद्वार अडवून भर रस्त्यात रिक्षा उभ्या करून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ४५ बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, चारही बाजूंनी वाहतूक पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत अडकल्याने त्यांना पळता आले नाही. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांचे कौतुक केले.
![डोंबिवलीत बेशिस्त रिक्षावाल्यांवर कारवाई](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tha-3-donbiwali-2-photo-mh-10007_05022021174758_0502f_1612527478_111.jpg)
या ४५ बेशिस्त रिक्षा चालकांना विष्णुनगर वाहतूक विभागात हजर करून प्रत्येकाकडून बाराशे ते चौदाशे रुपये दंड वसूल करण्यात आला. तर, १५ रिक्षाचालकांना नोटिसा देऊन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांनी दिली. वाहनतळ सोडून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर दररोज कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - न्यायमूर्ती पुष्पा गनेदीवाला यांना हटवा, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेतीची मागणी
बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी
मागील दोन वर्षापासून डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर बाजूकडील रेल्वे प्रवेशद्वाराच्या तोंडावर भर रस्त्यात गरीबाचा पाडा, नवापाडा, कुंभारखाण पाडा, राजूनगर, गणेशनगर भागात राहणारे स्थानिक भूमिपत्र असलेले रिक्षाचालक रिक्षा उभ्या करतात. त्या ठिकाणाहून प्रवासी वाहतूक करतात. रस्त्यात आणि रेल्वे प्रवेशद्वारावर रिक्षा उभ्या केल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा येतो. या भागात वाहतूक कोंडी होते. फलाटावर जाणाऱ्या प्रवाशांना वाट शोधत जावे लागते. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत आणि वाहतूक पोलीस या ठिकाणी तैनात नसला की, त्याचा पुरेपूर गैरफायदा हे रिक्षा चालक घेतात. रिक्षा चाहनतळावर रिक्षा उभी करून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या चालकांवर हे बेशिस्त रिक्षा चालक अन्याय करतात. नोकरी, व्यवसाय नसलेले स्वतःचा रिक्षा परवाना, बिल्ला नसलेले हे रिक्षा चालक मूळ रिक्षा चालकाची रिक्षा भाड्याने चालवण्यासाठी घेतात.
दोन दिवसापूर्वी महिला वाहतूक सेवकाला मारहाण
दिवसभरात एक हजार रुपये प्रवाशी वाहतुकीतून मिळाले तर, यामधील ५०० रुपये मूळ मालकाला देतात. उर्वरित रक्कम हे बेशिस्त रिक्षा चालक नशापान, चायनिज, नौजमजेसाठी वापरतात, असे काही रिक्षा चालकांनी सांगितले.
नोकरी नसल्याने झटपट पैसे कमविण्यासाठी हे तरुण रिक्षा चालक रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. या रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांनी हटकले तर त्यांच्याशी उद्धटपणे वागतात. दोन दिवसांपूर्वी महिला वाहतूक सेवकाला मारहाण करण्याचा प्रयत्न या बेशिस्त चालकांनी केला होता. इतर वाहन चालकांनी बाजूला घेण्यास सांगितले तर, त्याला मारहाण करतात.
रिक्षाचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई
गुरुवारी संध्याकाळी डोंबिवली चाहतूक विभागाच्या प्रमुख राजश्री शिंदे अचानकपणे आपल्या सहकाऱ्यांसमवेत वेगळ्या मार्गाने रेल्वे स्थानक भागात आल्या. त्यांना ५० हून अधिक रिक्षाचालक रेल्वे प्रवेशद्वार, वाहनतळ सोडून भर रस्त्यात उभे राहून प्रवाशी गोळा करीत असल्याचे लक्षात आले. शिंदे यांना पाहताच तत्काळ तेथून पळून जाण्याचा प्रयत्न रिक्षा चालकांनी केला. त्यांना महात्मा फुले रस्ता, गुप्ते रस्ता आणि दीनदयाळ रस्ता अशा तिन्ही बाजूंनी वाहतूक पोलीस आणि सेवकांनी घेरले. या सर्व रिक्षांचे मोबाईलमधून शूटिंग करून त्यांना कारवाईसाठी विष्णुनगर वाहतूक विभागात आणण्यात आले. संध्याकाळी पाच पासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत पकडलेल्या रिक्षाचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. अनेक रिक्षाचालकांनी यापूर्वीची दंडात्मक रक्कम भरणा केली नव्हती. तीही यावेळी वसूल करण्यात आली, असे शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा - यशोमती ठाकूर यांनी राज्यपालांबाबत केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद