ठाणे - धावत्या मेलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात फलाट आणि रेल्वेच्या गॅपमध्ये पडलेल्या एका 79 वर्षीय वयोवृद्ध प्रवाशाचा दोन आरपीएफ जवानांच्या प्रसंगावधनामुळे जीव बचावल्याची घटना समोर आली आहे. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी (ता. 29 जानेवारी) घडली. आपला जीव वाचविल्याबद्दल या वयोवृद्ध प्रवाशाने आरपीएफ जवानांचे आभार मानले. मासुर बफुर अहमद असे जीव वाचवलेल्या प्रवाशाचे नाव आहे.
हेही वाचा - 'या' वेळेत लोकल प्रवास केल्यास होणार कारवाई
काळ आला होता, मात्र वेळात दोन जवानांनी दाखवली सतर्कता
दिल्लीतील रहिवासी असलेले प्रवासी मासुर बफुर अहमद हे कल्याणहून दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. ते फलाट नंबर ४ वर पंजाब मेलने जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात आले होते. शुक्रवारी रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी कल्याण रेल्वे स्थानकातील चार नंबर फलाटावर येताच दिल्लीतील रहिवासी असलेले प्रवासी मासुर बफुर अहमद यांनी चालत्या पंजाब मेलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा पाय घसरल्याने ते फलाट आणि रेल्वेच्या मधील गॅपमध्ये पडले. यावेळी फलाटावर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवान एस. पी. यादव आणि जितेंद्र गुजर यांनी तत्काळ धाव घेत मासूर यांना फलाटावर ओढून घेत त्याचा जीव वाचवला. रेल्वे जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव असल्याने या प्रवाशासह इतर प्रवाशांनीही आरपीएफ जवानांचे आभार मानले.
हेही वाचा - भिवंडी रुग्णालयात सर्पदंश झालेल्या आदिवासीचा ‘व्हेंटिलेटर‘अभावी तडफडून मृत्यू