नवी मुंबई - नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रवासी रिक्षा चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी नवी मुंबई पोलीस आयुक्तांलयात येत होते. सहा महिन्यांत 143 प्रवासी रिक्षा चोरी झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून एका चोरट्याला नवी मुंबई गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. या चोरट्यांकडून 9 रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत.
नवी मुंबईत मध्यरात्री रिक्षा चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. रात्री पार्क केलेली रिक्षा हातोहात सकाळी गायब होत असत. अशा एक दोन नव्हे तर कित्येक तक्रारी नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात प्राप्त होत होती. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी या चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या माध्यमातून प्रवासी रिक्षा चोरट्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मुंबई व नवी मुंबई परिसरात प्रवासी रिक्षा चोरी करणारी टोळी सक्रिय होती. त्यांनी रात्रीचा फायदा घेत कित्येक रिक्षा चोरी करून रिक्षाच्या विविध पार्टची चोरी करणे, तसेच चेसिस व इंजिनची अदला बदल करून हे इंजिन वापरत होते.
मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या माध्यमातून आरोपीला अटक
नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार केले. प्रवासी रिक्षा चोरी करणारा चोरटा मुस्लिमउद्दिन शेख (39) हा कल्याण ठाकुरपाडा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून सापळा रचून आरोपी मुस्लिमउद्दीन शेखला अटक करण्यात आली. अधिक चौकशीत त्याने मुंबई व नवी मुंबई परिसरात त्याच्या साथीदारांच्या मदतीने अनेक रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. त्यांचाकडून 5 लाख 65 हजार किमतीच्या 9 प्रवासी रिक्षा जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
हेही वाचा - औरंगाबाद : देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या चौधरी कुटुंबियांवर काळाचा घाला, कार पाण्यात पडून तिघांचा मृत्यू