ठाणे - प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या दोन भामट्यांनी मिठाईतून रिक्षाचालकाला गुंगीचे औषध देत, त्याच्या गळयातील ४० हजार रुपयांची सोनसाखळी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णासाहेब भालेराव (५२) असे या रिक्षा चालकाचे नाव आहे.
हेही वाचा... 'राजकारण असो वा आरोग्य, डॉक्टरचा सल्ला घेणे कधी सोडायचं नाही'
अंबरनाथ येथील जावसई गाव परिसरात अण्णासाहेब भालेराव हे रिक्षाचालक राहतात. दुपारी अडीचच्या सुमारास ते रिक्षा चालवत असताना दोन अज्ञात व्यक्ती प्रवासी म्हणून त्यांच्या रिक्षात बसले. त्या व्यक्तींनी रिक्षाचालक भालेराव यांना सेंच्युरी हॉस्पिटल येथे सोडण्यास सांगितले. त्यांना रिक्षातून घेऊन जात असताना, त्या भामट्यांनी विकत घेतलेल्या मिठाईत गुंगीचे औषध टाकले आणि ती मिठाई भालेराव यांना खायला दिली. ती मिठाई खाल्यानंतर भालेराव बेशुध्द झाले. त्यानंतर त्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील ४० हजार रूपये किंमतीची सोनसाखळी घेऊन पळ काढला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात त्या दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा... 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट: अखेर 'त्या' वीरपत्नीला जमीन मिळणार, मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल