ठाणे - एकेकाळी शेकाप त्यांनतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुरबाड विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपध्ये प्रवेश केला आणि आमदारकी मिळवली. मात्र यावेळी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असलेले सुभाष पवार यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला रामराम ठोकून समर्थकांसह शिवसेनेनेत प्रवेश केला आहे. त्यातच यावेळी शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुरबाड मध्ये सेनेचा भगवा फडकणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सेनेच्या वतीने सुभाष पवार हे निवडणूक लढविणार असल्याचे राजकीय गणित समोर आले आहे.
विशेष म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले दोन्ही प्रतिस्पर्धी आमनेसामने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून शिवसेनेही मोके का फायदा उचलत ' काट्याने काटा ' काढण्याची खेळी केली आहे. त्यामुळे भाजप सेनेच्या चक्रव्यूहात अडकल्याची चर्चा सध्या मुरबाड तालुक्यात रंगली आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात २००५ मध्ये शिवसेनेचे साबिरभाई शेख यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर किसन कथोरे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत अंबरनाथ मतदारसंघातील बराचसा भाग मुरबाड मतदारसंघाला जोडला गेल्याने व आरक्षण बदलल्याने कथोरे यांनी २००९ची विधानसभा निवडणूक मुरबाड मतदारसंघातून लढवली. त्यावेळी तत्कालीन आमदार गोटीराम पवार यांना डावलून राष्ट्रवादीने कथोरेंना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत विजय मिळवून ते दुसऱ्यांदा विधानसभेत गेले. त्यानंतर सन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आणि या निवडणुकीतही विजय मिळवून आमदारकीची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
मुरबाड मतदारसंघातील मागील दोन निवडणुका पाहता त्यांना माजी आमदार गोटीराम पवार व बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी कथोरेंना टक्कर देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. २००९च्या निवडणुकीत किसन कथोरे यांना ५५ हजार ८३०, अपक्ष निवडणूक लढवणारे गोटीराम पवार यांना ४९ हजार २८८, मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे वामन म्हात्रे यांना ३७ हजार ८० आणि भाजपचे दिगंबर विशे यांना २५ हजार २५८ मते मिळाली होती. त्यानंतर झालेल्या २०१४च्या निवडणुकीतही पुन्हा किसन कथोरे यांचा गोटीराम पवार व वामन म्हात्रे यांच्याशी सामना झाला. या निवडणुकीत कथोरे यांनी ८५ हजार ५४३ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे गोटीराम पवार यांना ५९ हजार ३१३, तर शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना ५३ हजार ४९६ मते मिळाली.
गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र व ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र अलीकडेच सुभाष पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून सेनेकडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी तेही इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपाची युती होणार का? आणि युती न झाल्यास शिवसेनेची खेळी यशस्वी होणार का ? हे येत्या काही दिसवातच समोर येईल.