ठाणे : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेला पाच दिवस पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेची माहिती गुरुवारी सकाळी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्यानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी असलेल्या टीडीआरएफच्या 22 जवांनाच्या टीमने इर्शाळवाडीकडे कूच केली. ठाण्याच्या या टीमने चार दिवसात तब्बल 27 मृतदेह आणि 3 जखमींना बाहेर काढण्यात मोलाचे मदत कार्य केले. ठाणे महापालिकेच्या या टीमने इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मोठ्या धैर्याने शोधमोहीम केल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. सोमवारी इर्शाळवाडीवरुन ठाण्यात ही टीम दाखल झाली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दुर्घटनेच्या जखमा दिसून आल्या आहेत.
एनडीआरएफच्या धर्तीवर टीडीआरएफ : ठाणे जिल्ह्यासह इतर ठिकाणची कोणतीही आपत्ती असो, ठाण्याची टीडीआरएफ टीम लगेच घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात करते. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाची (टीडीआरएफ) स्थापना करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला होता. त्यानंतर या पथकामध्ये राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षित जवानांची नियुक्ती करण्यात आली. या जवानांना एनडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स, मुंबई आपत्ती प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पूर परिस्थिती किंवा इमारत दुर्घटना परिस्थितीत काय करावे, याचेही प्रशिक्षण या जवानांना देण्यात आले आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेत मोलाचे मदतकार्य : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर 19 जुलैला टीडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळाचा ताबा घेतला. 20 जुलैला सकाळी आठ वाजता 22 जवानांनी इर्शाळवाडी गड चढण्यास सुरुवात केली. हातामध्ये यंत्र सामुग्री घेऊन दीड तासांच्या प्रवासानंतर जवानांनी बचाव कार्यास सुरुवात केली. हे बचावकार्य तब्बल चार दिवस सुरू ठेवले. या चार दिवसात सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बचावकार्य करत असताना अनेक अडचणी जवानांना येत होत्या. मात्र, हे बचावकार्य पूर्ण करण्याच्या दिशेने जवान आपले कसब लावत होते. दरम्यान 27 मृतदेह आणि 3 जखमींना बाहेर काढण्यात टीडीआरएफच्या टीमला यश आले. अखेर चार दिवस सुरू असलेले शोधकार्य थांबवण्यात आले असून सोमवारी टीडीआरएफची टीम ठाण्यात पोहोचली आहे.
60 वर्षीय आजीला काढले जिवंत बाहेर : या दुर्घटनेत बचाव कार्य करताना राणी पारधी या 60 वर्षीय आजीला जिवंत बाहेर काढण्यात आले. तब्बल 12 तास मलब्याखाली जिवंत आजीला बाहेर काढून या जवानांनी आजीला जीवदान दिले. त्या अनुभवाने अंगावर काटा आल्याची माहिती बचाव कार्याचे नेतृत्व करणारे सचिन दुबे यांनी दिली.
हेही वाचा -