ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावर राजनोली नाका व भिवंडी-कल्याण रोड या परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉजिंग व्यवसाय फोफावला आहे. त्यातच याच परिसरातील एका लॉजवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने छापा मारून वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या छापेमारीत तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
सरवली ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-नाशिक महामार्गावर शेर-ए-पंजाब बार अँड लॉज असून या ठिकाणी महिलांकडून देहविक्रीय व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी तस्करी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर तेथील वेश्या व्यवसायासाठी महिला पुरविणाऱ्या दलालांशी संपर्क साधून बनावट ग्राहक मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास पाठवला होता. त्यानंतर दोन दलाल तीन महिलांना घेऊन त्या ठिकाणी आले असता पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल मदने, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार बाबरेकर, हवाळ, सोनवणे या पोलीस कर्मचाऱ्यांनी या दोघा दलालांना रंगेहात पकडले. त्यांच्या तावडीतून तीन महिलांची सुटका केली असून दोन दलालांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पीडित महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिली आहे.