ठाणे- उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण-शीळ मार्गावरील लोढा हेवन, पलावा सिटी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात स्थानिक प्रशासन हतबल ठरले आहे. दुसरीकडे नागरिकांच्या मनात असलेली भटक्या कुत्र्यांची भीती काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी पॉज या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. रविवारी 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी संस्थेचे प्रशिक्षित कार्यकर्ते आणि पशुवैद्यकांनी कल्याण-शीळ मार्गावरील पलवा सिटीमध्ये जाऊन सुमारे 136 च्या वर भटक्या कुत्र्यांना आणि त्यांच्या पिल्लांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले.
हेही वाचा- 'देशातील नागरिकांचे नागरिकत्व नरेंद्र मोदी किंवा राज ठाकरे ठरवू शकणार नाही'
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आवश्यक आहे. त्यांना रेबीज प्रतिबंधक लस दरवर्षी देणे जरुरी आहे. मात्र, कल्याण-शीळ मार्गावरील लोढा हेवन, पलावासिटी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. या परिसरात भटकणाऱ्या 4-5 कुत्र्यांच्या झुंडीने तेथील माही सिंग या 8 वर्षीय चिमुरडीवर हल्ला चढविला. या चिमुरडीचे ठिकठिकाणी लचके तोडल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशी संतापले आहेत. भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त न केल्यास मोठे आंदोलन करू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून रोजच अशा घटना घडत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासन का करत नाही ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्याच परिसरातीलल श्वेता मेहरा या महिलेवर 7-8 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या महिलेने प्रसंगावधान दाखवून स्वत:चा जीव वाचवला. मात्र, झटापटीदरम्यान या महिलेचा महागडा मोबाईल फुटला. या पार्श्वभूमीवर त्याच परिसरातील चंद्रेश शर्मा या रहिवाशाने स्थानिक प्रशासनाचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले होते. मुख्य रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडी फिरत असतात. दुचाक्यांच्या मागे ही कुत्री झुंडींनी धावत असतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडण्याची शक्यता असते. प्रशासनाने कुत्र्यांच्या विषयी लक्ष घालावे आणि त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती.
या घटनांची पॉजने दखल घेतली आहे. जवळपास 16 जणांच्या टीमने लसीकरण मोहिमेत भाग घेऊन पलावामधील कासा रिओ, कासा रिओ गोल्ड, गोल्फ लिंक्स, लेक शोर ग्रीन, या भागात फिरून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले. पॉज संस्था गेली 20 वर्षे ही अविरत सेवा देत आहे. आतापर्यंत संस्थेने 40 हजारहून अधिक प्राण्यांना ही लस टोचली आहे. पलावा सिटीमधील श्वानांना रेफ्लक्टिव्ह कॉलर घालण्यात आली. ही कॉलर गाडी किंवा दुचाकी वाहनाच्या प्रकाशात चमकते. ज्यामुळे प्राणी व मनुष्य यातील रात्री होणारे अपघात टळतात. या प्रसंगी आमदार प्रमोद तथा राजू पाटील स्वतः उपस्थित राहून त्यांनी पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे भारतातील कोणतीही संस्था, असे उपक्रम राबवत नसली तरीही आमची संस्था यापुढेही निरनिराळ्या भागात जाऊन भटक्या कुत्र्यांचे लसीकरण चालूच ठेवले जाईल, असे प्लांट अँड अनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक निलेश भणगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.