ठाणे- मिरा भाईंदर मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी आज गणेशोत्सव आणि विसर्जन संबंधित नियमावली जाहीर केली. यामध्ये शहरातील चौपाटीवर, तलावमध्ये मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गणेश भक्त तसेच मूर्तिकारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर मूर्तिकार संघटनेने अतिरिक्त आयुक्त महेश बुरुडकर यांना गणपतीचा पुतळा देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील, निखिल तावडे, पवन घरत, मूर्तिकार उद्धव भोईर, छोटू पाटील, बाबू पाटील, सचिन रोजले उपस्थित होते.
हे आहेत नियम...
मिरा भाईंदर मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या नियमांनुसार सार्वजनिक मंडळांमध्ये 4 फूट उंच मूर्ती राहील, घरगुती 2 फूट उंच मूर्तीची स्थापना करता येईल, गणपती आगमन आणि विसर्जनवेळी केवळ ५ व्यक्तींना परवानगी असेल, मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल, धातू, नैसर्गिक माती, शाडूची माती यापासून बनवलेल्या मूर्ती स्थापित करणे, तसेच शक्य असल्यास यंदा मूर्तीचे विसर्जन न करणे, पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात विसर्जन करणे, दर्शन इत्यादींसाठी जास्तीत जास्त डिजिटल तंत्रज्ञानांचा वापर करणे, असे नियम महापालिकेने घातले आहेत.
त्याचबरोबर, सर्व चौपाटी विसर्जनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. म्हणूनच घरगुती गणपतीचे विसर्जन घरातच करावे. सार्वजनिक गणपतीचे विसर्जन इमारत संकूल किंवा योग्य ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून करावे. त्याकरिता मदत लागल्यास लोकप्रतिनिधी आणि प्रभाग अधिकाऱ्यांना संपर्क साधावा, असे प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच राज्य सरकारने जारी केलेल्या कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व चौपाटी, तळांमध्ये गणपती विसर्जन होणार नाही. शक्यतो घरीच विसर्जन करावे. तसेच, सर्व राज्य सरकार आणि मीरा भाईंदर मनपाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशी माहिती महापौर जोस्ना हसनाळे यांनी ईटीव्ही भारतला दिली.
हेही वाचा- मनसेने कोकणात सोडल्या 25 मोफत बसेस, चाकरमान्यांना दिलासा