नवी मुंबई - गेल्या कित्येक वर्षांपासून नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे नवी मुंबई शहरातील अनेक इमारती या धोकादायक ठरत असून, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या इमारतींची पुर्नबांधणी करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. अखेर या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पूर्वी जे अडीच चटई क्षेत्र मंजूर करण्यात आले होते. त्या ऐवजी 4 चटई क्षेत्र मिळावे म्हणून बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मागणी यापूर्वीच केली होती. आता तो प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.
नवी मुंबईतील सिडकोनिर्मित आणि खासगी धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने 4 एफएसआयचा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे येत्या दोन दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच येत्या नवीन वर्षात 4 चटई क्षेत्राची देखील नवी मुंबईतील नागरिकांना भेट मिळणार आहे.
यापूर्वी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईत अडीच चटई क्षेत्राची मागणी केली होती. मात्र अडीच चटई क्षेत्र पुरेसे नसल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी 4 चटई क्षेत्राची मागणी केली. त्याची यासंदर्भात 16 नोव्हेंबरला बैठक झाली. त्यानंतर 10 डिसेंबर या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व सही झाली. त्यानंतर आता सिडकोचे एमडी याबाबतचा प्रस्ताव देतील. त्यानंतर आता सिडकोकडून 4 चटई क्षेत्रात विकास कामे कशी करु शकतो. व यासाठी किती चटईक्षेत्र लागेल याबाबत समिती गठीत केली आहे. त्याचा अहवाल तयार केला आहे,” असे आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या.
मान्यतेनंतर इमारतींची पुनर्बांधणी-
याबाबत अनेकांशी चर्चा केली आहे. हा अहवाल सरकारकडे पाठवला जाईल, त्याला मान्यता मिळल्यानंतर इमारतींची पुनर्बांधणी केली जाईल. अडीच चटई क्षेत्रात कोणताही विकासक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी पुढे येत नव्हता, मात्र क्षेत्रामुळे नक्कीच हा प्रश्न सुटला जाऊन नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बांधणी करता येईल, असा विश्वासही म्हात्रे यांनी व्यक्त केला.