ठाणे - शासनाने कोरोना रुग्णाकडून उपचारासाठी बिल आकारणी दर ठरवून दिले आहे. त्यानुसारच खासगी रुग्णालयांनी बिल आकारणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, शासनाच्या आदेशानंतरही कल्याण-डोंबिवलीतील खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लुट सुरुच असल्याचे प्रकार समोर येत आहे. पुन्हा एकदा डोंबिवलीतील ममता रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी ज्यादा बिल आकारत मृतदेह रोखून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी बिलाची तब्बल पावणे दोन लाख रुपये रक्कम कमी करुन घेत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यानंतर रुग्णाची लूट करणाऱ्या सर्वच रुग्णालयांना त्यांनी कोरोनाच्या या काळात माणुसकी दाखवा अन्यथा रुग्णालय जागेवर दिसणार नाही, शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी दिला.
कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी लाखोंची बिले उकलली जात आहेत. काही दिवसांपूर्वी कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे चुकीच्या पद्धतीने आकारलेले बिल कमी करण्यास नकार देणाऱ्या प्रशासनाला समज देत नगरसेवक महेश गायकवाड यांनी पीपीई किट घालून रुग्णाला उचलून स्वत:च्या गाडीतून घरी नेऊन सोडले होते. मात्र, यानंतर काल (शनिवारी) पुन्हा एका महिला रुग्णाच्या बाबतीत असाच प्रकार घडला. डोंबिवलीतील ममता या खासगी रुग्णालयात या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर या महिलेचा मृतदेह देण्यापूर्वी बिल भरण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, आकारलेले बिल कितीतरी अधिक असल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी नगरसेवक गायकवाड यांच्याकडे मदत मागितली.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक गायकवाड यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. यानंतर सारवा-सारव करत रुग्णालय प्रशासनाने तब्बल 1 लाख 75 हजार रुपयाचे बिल कमी करून देत मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात रुग्णालये रुग्णाच्या नातेवाईकाची लुट करत आहेत. रुग्णालयांनी माणुसकी दाखवावी, एखद्या गरीब रुग्णाकडे पैसे नसतील तर त्यांना बिल कमी करून द्यावे, त्यांना वेठीस धरु नका. पुन्हा असे गंभीर प्रकार निदर्शनास आले तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल. एकही रुग्णालय जागेवर दिसणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना दिला आहे.