ठाणे - लॉकडाऊन, संचारबंदी आणि कोरोना प्रादुर्भावामुळे इतर आजारांच्या रुग्णांचे हाल होत आहेत. रूग्णालय प्रशासन अशा इतर रुग्णांना दाखल करून घेत नसल्याने उपचारा अभावी अनेक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मुंब्रा परिसरातील ठाकुरपाडा येथील एका गर्भवती महिलेला रुग्णालयांनी उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने तिचा मृत्यू झाला.
ठाकूरपाडा येथे राहणाऱ्या इमाम अकबर मेहंदी यांची पत्नी आसमा या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने मेहंदी यांनी 26 मे ला आसमा यांना उपचारासाठी नेले. मुंब्रामधील बुरहानी, बिलाल, प्राईम रुग्णालयात आणि कळवा येथली शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांनी आसमा यांना दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आसमा यांना कोणत्याही रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही.
अखेर एका नातेवाईकाच्या ओळखीने आसमा यांना काळसेकर रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा आसमा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. आसमा यांना ऑक्सिजनची गरज होती, पण वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या वाचू शकल्या नाहीत. खासगी आणि शासकीय रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची तक्रार इमाम मेहंदी यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
या तक्रारीनंतर ठाणे महानगरपालिकेने प्राईम, बिलाल आणि युनिव्हर्सल या खासगी रुग्णालयांवर कारवाई केली. मात्र, काळसेकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या पालिकेच्या रुग्णालयांना अभय देण्यात आल्याचा आरोप मेहंदी यांनी केला आहे.