मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर पश्चिमेस एका खासगी जागेत बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य हुक्क्याची पार्टी करणाऱ्या एका वकिलासह एकूण सहा जणांना भाईंदर पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. विशेष म्हणजे सायबर गुन्ह्यात मदत केल्याबद्दल या वकिलास पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशस्तीपत्र दिले होते. फेसबुकवरही या वकिलाने पोलीस, राजकारण्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
भाईंदर पश्चिमेच्या भोला नगर समोर स्पॅन व्हेंचर भूखंडाच्या मागील बाजूला नियमित हुक्का पार्टी चालत असल्याच्या तक्रारी पोलिसांना येत होत्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली भाईंदर पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या पोलीस पथकाने सोमवारी रात्री या ठिकाणी छापा टाकला असता तेथे हुक्का पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. यातील आरोपी अॅड. हर्ष शर्मा याला सायबर गुन्ह्यात मदत केल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, नया नगरचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी प्रशस्ती पत्रक दिले आहे.
हेही वाचा - मटका किंग नगरसेवकाचा तीन वर्षांत जुगारातून 307 कोटींचा व्यवसाय; सोलापुरात उभारले साम्राज्य
पोलिसांनी गुन्हा दाखल करून अॅड. हर्ष राजेश शर्मा (२९), संजय बुदराज मुनोत (३३), पीयूष मित्तल (२८), भवरसिंह परमार (३२), अक्षय कोया (२६), राजदीप विमल दास (२२) या सहा जणांना अटक केली आहे. त्याठिकाणी कायद्याने बंदी असलेल्या तंबाखूजन्य हुक्क्याची पार्टी सुरू होती. ही जागा कोणाच्या मालकीची व कोण सांभाळत आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - शहाद्यात जुगार अड्ड्यावर छापा; 43 जणांना अटक; 78 लाखांचा मुद्देमाल जप्त