ठाणे- आदिवासी पाड्यात राहणाऱ्या 150 कुटुंबावर संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ येवून ठेपल्याचे कोनगाव पोलिसांच्या पाहणीत दिसून आले होते. यानंतर कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांनी तत्काळ डी.वाय.फाऊंडेशनचे संस्थापक दयानंद चोरघे यांच्याशी संपर्क करून या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या कुटुंबाच्या झोपड्यात अन्नधान्याचे वितरण करून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवून सामाजिक बांधिलकी जपल्याचे समोर आले आहे.
कोरोना विषाणूमुळे जगभरात हजारो नागरिकांचे बळी गेले आहे. त्याच कोरोनामुळे ठाणे जिल्ह्यातील मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी कुंटुंबाना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोनगावच्या हद्दीत असलेल्या आदिवासी पाड्यात सुमारे 150 कुटुंब राहतात. या पाड्यातील कुटुंबीयांच्या झोपडीत संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे गेल्या तीन ते चार दिवसापासून अन्नचा एकही कण नसल्याने दीडशे आदिवासी कुंटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेवली होती.
सहाय्यक पोलीस आयुक्त कौसडीकर आणि डी.वाय.फाउंडेशनचे संस्थापक दयानंद चोरघे यांचे हस्ते आज मात्र या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये डाळ, तांदूळ, तेल, कडधान्य, गव्हाचे पीठ अश्या जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. दरम्यान, यावेळी सहा. पोलीस आयुक्त कौसडीकर यांनी या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या कुटुंबांना कोरोना विषाणूची माहिती दिली. त्यापासून कसे सुरक्षित राहाल तसेच यासंदर्भात कोणती दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन व सूचना दिली, अशी माहिती माहिती कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांनी दिली आहे.