ठाणे- महागड्या बुलेट बाईक चोरी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला कोपरी पोलिसांनी गजाआड केले आहे. प्रतीक प्रमोद पालकर (वय 22, रा. चिकणघर, कल्याण), विशाल विजय चाळके ( वय 26, हरिओम नगर, मुलुंड), नितीन सुनील वाडकर ( वय 20, राबोडी, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या चोरट्यांच्या ताब्यातून 14 लाख 65 हजार रुपये किमतीच्या 10 बुलेट हस्तगत करण्यात आल्याची माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी दिली.
कोपरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बाईक चोरांनी धुमाकूळ घातला होता. या चोरट्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार कोपरी पोलिसांनी गस्त वाढवून विविध भागात साध्या वेशात टेहळणी सुरू केली होती. दोन व्यक्ती बुलेट चोरी करण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, 11 सप्टेंबर रोजी कोपरी पोलिसांचे एक पथक श्री मा शाळेजवळ सापळा रचून निगराणी करीत असताना दोन संशयास्पद व्यक्ती पार्क केलेल्या गाड्यांचे हँडल लॉकची चाचपणी करताना आढळून आले.
हेही वाचा-भिवंडीत २१ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी बुलेट बाईक चोरी करीत असल्याची कबुली दिली. चौकशीमध्ये त्यांच्या आणखी एका साथीदाराचे नाव समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तिसऱ्या साथीदारास देखील राबोडी परिसरातून अटक केली. या चोरट्यांच्या ताब्यातून 10 बुलेट बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत. या टोळीने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून या बाईक चोरी केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या टोळीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.