ठाणे- सीडीएममध्ये नकली नोटा जमा करणाऱ्या एका व्यक्तीला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती सीडीएममध्ये नकली नोटा जमा करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सीडीएम मशीनने या नोटा बाहेर फेकल्या. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी भामट्याला अटक केली आहे. चेतन मठालिया (वय.४५) असे बनावट नोटा जमा करणाऱ्याचे नाव आहे.
चेतन मठालिया हा शहरातील घोडबंदर रोडवरील कावेसर, वाघबीळ येथील टीजेएसबी बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी गेला होता. त्याने आपल्या जवळील ५०० रुपयांच्या नोटा असलेली एकून ४२ हजाराची रक्कम सीडीएम मशीनमध्ये जमा केली. या रक्कमेत ४ हजार रुपयांच्या ५०० च्या नोटा नकली होत्या. नोटा जमा झाल्यावर चेतन याला आपली चालबाजी वठली असे वाटले. मात्र, घडले उलटेच. सीडीएम मशीनने लगेच एकून ४२ हजार रक्कमेतून ४ हजार रुपयांच्या नकली नोटा बाहेर काढल्या. त्याने वारंवार या नोटा सीडीएममध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न फसले.
हा सर्व प्रकार बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ कासारवडवली पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याआधारे पोलिसांनी चेतनचा छडा लावला. पोलिसांनी त्याला सुरज वॉटर पार्क जवळील वसंत लीला कॉम्प्लेक्समधून अटक केली.