ठाणे - साडे सहा लाख रुपयांच्या कापडांचे तागे लंपास करणाऱ्या दुकलीला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या ५ ते ६ तासात भोईवाडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना भिवंडी शहरातील अजंटा कंपाऊंड येथील नवकार अपार्टमेंटमधील एका गाळ्यात घडली होती. सुजित शिवचंद केसरवाणी आणि मनोज नरसिंह सिंह असे लाखोंचा कपडा लंपास करणाऱ्या चोरट्यांची नावे आहेत.
भिवंडी शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटना पोलीस नागरीक, व्यावसायिकांसोबतच प्रशासनालाही डोखेदुखी ठरत आहे. अशातच, रात्रीच्या सुमारास अजंटा कंपाऊंड येथील नवकार अपार्टमेंटमधील बंद गाळ्याचे कुलूप बनावट चावीने उघडून त्यातील विविध दर्जाच्या कपड्यांचे १६० तागे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी गाळा उघडल्यानंतर व्यवस्थापकाच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी मालक निसार अहमद रमजान खान यांना चोरीच्या घटनेची माहिती दिली. खान यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली.
हेही वाचा - कोरोनाच्या अफवांविरोधात आयएमए सज्ज; अफवांविरोधी मोहीम सुरू
भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. दरम्यान, भोईवाडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एसएम घुगे व पोलीस कर्मचारी दराडे, गोरले, सूर्यवंशी, शिंगाडी, भवर या पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेऊन अवघ्या ६ तासात शहरातील घुंगट नगर परिसरातून या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून त्यांनी लपवून ठेवलेले १६० तागे, धाग्याच्या बॅग व चोरी करण्यासाठी वापरलेला टेम्पो असा एकूण ७ लाख ९९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हेही वाचा - Coronavirus: रायगडचे दुबई रिटर्न क्रिकेटर्स पनवेल उपजिल्हा रुग्णालयात