ठाणे - दुकानासमोरील शेड हटवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शेजारी असलेले मोठे झाड पाडले. झाड पाडण्याची कोणतीही परवानगी नसताना झाड पाडल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वंदना टॉकीज जवळ अरिहंत नावाचे दुकान आहे. दुकानशेजारी पिंपळाचे मोठे झाड आहे. पावसाळ्यामध्ये दुकानात पाणी शिरत असल्याने त्याच्या बचावासाठी दुकानासमोर शेड टाकण्यात आले होते. मात्र महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी जेसीबी ने शेड काढायला आले. शेड पाडत असताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती काळजी न घेतल्याने बाजूला वर्षानुवर्षेपासून असलेल्या पिंपळाचे झाड देखील पाडण्यात आले.
गेल्या 8 ते 10 वर्षांपासून तेथील नागरिक पिंपळाच्या झाडाची काळजी घेत आहेत. हे झाड धोकादायक असल्याने ते पाडाले लागेल असे सांगून झाड पाडण्यात आले. आणि कर्मचारी निघून गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महानगरपालिकेला कोणतेही झाड तोडण्याची परवानगी नाही. तसे झाल्यास सबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. मात्र या प्रकरणात दोषींवर महापालिका काय कारवाई करेल काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.