ठाणे : गेल्या २६ एप्रिल २०२३ रोजी शहापूर तालुक्यातील काजूपाडा पिंपळपाडा आदिवासी वस्तीमध्ये राहणारा योगेश टबाले याची पत्नी योगिता लाकुड फाटा गोळा करण्यासाठी जंगलात गेली होती. त्यावेळी तिच्या मागोमाग दोन वर्षांचा बालक पियुष उर्फ घोलू हा घरातून बाहेर पडला. हे योगिताला समजून आले नाही. पियुष घरी आहे या कल्पनेने ती जंगलातून लाकडे घेऊन आली असता छोटा पियुष तिला घरात दिसून आला नाही. परिसरातील पाडे वस्तीमध्ये सर्व वस्तीतील लोकांनी शोध घेतला असता कुठेही तो आढळून आला नाही. त्यानंतर खर्डी पोलिस ठाण्यात पियुष बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
कवटीचे सापडले ४ ते ५ तुकडे : याचा पोलीस तपास सुरू असतानाच गुरुवारी २० जुलै रोजी शहापूर तालुक्यातील कुंभयीचा पाडा डोंगरातील जंगलात पायथ्याशी पियुषने घातलेला नवीन रक्ताळलेला, बटन तुटून पडलेला शर्ट दिसून आला. तर पियुषच्या कवटीचे ४ ते ५ तुकडे त्याच परिसरात पसरलेले होते. परंतु, संपूर्ण शरीराचा सांगाडा गायब असल्याने पोलिसांना दिसून आले. तर रक्ताळलेला शर्ट पियुषच्या आईवडिलांना पोलिसांनी दाखवला असता तो शर्ट पियुषचा असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगाड्याचा शोध सुरू : शहापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पियुषच्या सांगाड्याचा मुसळधार पावसात जंगलातील झाडे झुडपात पोलिसांनी शोध घेतला. मात्र कुठेही काही सापडले नाही. तर दुसरीकडे लहान बालकांवर तांत्रिक विद्या प्रयोग वापरासाठी पियुषला जंगलात आणले असावे अथवा जंगलात हिंस्र प्राणी, वा श्वापदांनी छोट्या पियुषला मारून खाऊन टाकले असण्याची शक्यता, ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे.
कवटीचे तुकडे फॉरेंसिक लॅबकडे : पियुषचा अर्धवट स्थितीतील रक्ताळलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी कवटीचे तुकडे फॉरेंसिक लॅबकडे तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. आई वडिलांचे डीएनए सॅम्पल घेऊन सोमवारी तपासणीसाठी लॅबला पाठविणार असल्याचे पोलीस तपास अधिकारी नितीन खैरनार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -
Building Collapses In Bhiwandi: भिवंडीत दुमजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, दुसऱ्याला वाचवण्यात यश