ठाणे - कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजुने निकाला लागला आहे. याबाबत पाकिस्तानला सणसणीत चपराक देत ICJ न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंद साजरा केला जात आहे. ठाण्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाचे स्वागत करत फटाके फोडले आणि साखर वाटून आनंद साजरा केला.
हा निर्णय म्हणजे संपुर्ण भारताचा विजय आहे. हा निर्णय म्हणजे भारताच्या एकजुटीचा निर्णय आहे. हा निर्णय म्हणजे पाकिस्तानला एक धडा आहे, असे सांगत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
कुलभूषण जाधव यांना हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली २०१६ साली मार्च महिन्यात पाकिस्तानने अटक केली होती. त्यानंतर तेथील लष्करी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती. कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र, या भेटीवेळेस या दोघींवर अनेक बंधने घालण्यात आली होती. बांगड्या, मंगळसूत्र आणि पादत्राणेही काढून तेही काचेच्या पलिकडे बसून भेटण्याची परवानगी देण्यात आली. तसेच मराठीतून बोलण्यासही मनाई करण्यात आली होती.