ठाणे - पैसे चोरल्याचा संशयावरून मालकाने २ साथीदारांच्या मदतीने कामगाराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नोकराचा मृतदेह एका गोणीत भरून ओढ्यात टाकून आरोपी पसार झाले होते. मात्र कल्याण पोलिसांच्या गुन्हे शाखेने या अत्यंत किचकट व गंभीर स्वरूपातील हत्येचा उलगडा केला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कामगाराच्या मालकाला अटक केली आहे.
सुनील श्रीराजवा पटेल (28, रा. पांडुरंग वझे कम्पाऊंड, ललीत काट्याजवळ, मानपाडा) असे अटक केलेल्या मालकाचं आहे. तर सुरीज स्वरूपवा पाल (18, मूळचा रा. ग्राम भदेहदू तह. बबेरू, जि. वादा, उत्तरप्रदेश) असे हत्या झालेल्या नोकराचे नाव आहे.
कल्याण-शीळ मार्गावर असलेल्या क्लासीक हॉटेलच्या पानटपरीवर काम करणारा कामगार आणि टपरी मालकांमध्येकाही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणादरम्यान त्यातील नोकराची हत्या झाल्याची माहिती कल्याण पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या पथकाने सुरुवातीला आरोपी मालक सुनिल पटेल याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता, नोकराची हत्या केल्याची माहिती समोर आली.
आरोपी सुनील पटेल याची एक पान टपरी आहे. त्या टपरीवर काम करणारा कामगार सुरीज याने गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयातून आरोपी सुनील आणि कामगाराचे भांडण झाले. त्या दरम्यान आरोपीने त्याच्या इतर दोन कामगारांच्या सहाय्याने सूरीजला लाकडी दांडका, गॅस पाईप व कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच डोके जमिनीवर व भिंतीवर आदळून ठार मारले. विशेष म्हणजे तिन्ही आरोपीने सूरीजच्या मृतदेहासोबतच रात्र काढली. त्यानंतर सकाळच्या सुमारास सुरीजचा मृतदेह गोणपाटात भरून त्याच क्लासीक हॉटेलच्यामागील बाजूस असलेल्या दलदलयुक्त ओढ्यात फेकून दिला असल्याची कबुली सुनील याने पोलिसांना दिली.
या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाण्यात मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले. त्यावेळी ओढ्याच्या उत्तर दिशेच्या काठाजवळील दलदलीत लाकडी प्लायवूडच्या खाली एक गोणी आढळून आली. या गोणपाटात बांधलेला मृतदेह सुरीज पाल याचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सुरीजचा मृतदेह केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलकडे पाठवून दिला.
गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास कौशल्याने करून दुसऱ्या अल्पवयीन आरोपीलाही अटक केली आहे. तर तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मानपाडा पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.