नवी मुंबई - सीबीडी बेलापूर येथील दिवाणी न्यायालयात 12 डिसेंबरला लोकअदालतीचे अयोजन करण्यात येणार आहे. ही अदालत गुगल मिट, व्हॉट्सअॅप वेबच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती न्यायाधीश तृप्ती देशमुख नाईक यांनी दिली आहे. यासाठी फिर्यादीला न्यायालयात हजर राहण्याची गरज नसणार आहे.
प्रलंबित खटल्यांचा लोक अदालतीमध्ये होतो लवकर निर्णय
दखल पूर्व प्रलंबित बँक वसुली, वीज बिल थकीत रक्कम, पाणीपट्टी, तडजोड योग्य फौजदारी खटले, धनादेश न वटणे, मोटार अपघात न्यायाधिकरणाचा दावा, न्यायालयात चालल्यास त्यावर निकाल येण्यासाठी जास्त कालावधी लागतो. मात्र हे प्रकरण लोक अदालतीमध्ये आल्यास त्यांच्यावर लवकर निर्णय होतो.
व्हॉट्सअॅप कॉल, गुगल मिट आणि वेबच्या माध्यमातून खटला चालवणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ डिसेंबरला बेलापूर सीबीडी येथील दिवाणी न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच आरोपी, फिर्यादी कोर्टात हजर न राहता ही लोक अदालत पार पडणार आहे. व्हॉट्सअॅप कॉल, गुगल मिट आणि वेबच्या माध्यमातून खटला चालवण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.
10 डिसेंबरपर्यंत अर्ज करणे बंधनकारक
डिजिटल माध्यमातून लोकअदालतीत खटला चालवण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात न्यायाधीश तृप्ती देशमुख नाईक यांनी अधिक माहिती दिली आहे.