नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात नागरिकांना कित्येक वेळा समजावून सांगूनही नागरिक फळे भाज्या तसेच किराणा मालाच्या दुकानात गर्दी करत होते. या पार्श्वभूमीवर आता नवी मुंबई व पनवेलमध्ये आजपासून संध्याकाळी 5 वाजता मेडिकल व हॉस्पिटल वगळता दुकाने बंद करण्यात येणार असून कोणीही रस्त्यावर आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
नवी मुंबईत सद्यस्थितीत 28 व पनवेल मध्ये 22 अशी कोरोना बधितांची संख्या आहे. दोन्ही शहरातील वाढती कोरोना बधितांची संख्या पाहता नवी मुंबई आयुक्तालयाच्या माध्यमातून संध्याकाळी 5 नंतर पनवेल व नवी मुंबई परिसरातील सर्व दुकाने तसेच भाजी मासे, फळे, मटण, चिकन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णालय, मेडिकल व एपीएमसी मार्केट सोडता नवी मुंबई, पनवेलसह सर्वच ठिकाणी 5 नंतर सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे आजपासून जी काही खरेदी असेल ती सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करायची आहे, असे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तांलयाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. तसेच आजपासून दररोज संध्याकाळी 5 नंतर कोणीही नागरिक रस्त्यावर दिसल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. लोकांकडून नियम पायदळी तुडवले जात असल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचेही पोलिसांच्या माध्यमातून सांगितले आहे.