ठाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन शक्तीप्रकरणी आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे मिशन शक्तीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात देशभरात चांगलीच टीकेची झोड उठल्याचे दिसत आहे.
यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले, की आजवर जगातील केवळ अमेरिका, रशिया आणि चीनला जमलेला पराक्रम आज भारताने करुन दाखवला. 'हम किसी सें कम नहीं' आणि नव्या भारतासाठी अशक्य असे काहीच नाही, हे आपण 'ऑपरेशन शक्ती 'द्वारे पुन्हा सिद्ध केले आहे.
क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती भारताने मिळवली आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोचे आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओचे मोलाचे योगदान आहे. या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे देशाची मान जगात अभिमानाने उंचावली आहे. त्यासाठी त्यांना सलाम करणे हे प्रत्येक देशवासीयांचे कर्तव्य आहे. पण लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने, देशाने घेतलेल्या या उत्तुंग भरारीचे राजकारण होणे अपेक्षितच होते. त्यानुसार ते सुरूही झाल्याचे ते म्हणाले.
इस्रो आणि डीआरडीओची स्थापना काँग्रेसनेच केली होती, येथपासून, ते २०१२ मध्येच 'मिशन शक्ती'ची सुरुवात झाली होती, येथपर्यंत बरंच काही लिहिले-बोलले जाते. परंतु, या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या धबडग्यात इस्रो, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची मेहनत आपण विसरता कामा नये असेही ते म्हणाले.