ठाणे- बदलापूर शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजेच्या समस्येविरोधात विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. कार्यालयातच कंदील, मेणबत्ती व दिवाबत्तीचा सेल लावून वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीचा निषेध करण्यात आला.
वारंवार निवेदने देऊनही बदलापूर महावितरण कार्यालयातील अधिकार्यांनी शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत न केल्याने तसेच वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडितमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज हे अनोख्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट महावितरण कार्यालयात कंदील मेणबत्ती आणि हात पंख्याचा सेल लावला होता. महावितरणच्या कारभाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना या वेळी कमी दरात कंदी, मेणबत्ती आणि हात पंख्याचे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच वीजपुरवठा खंडित झाला, तर या साहित्याचा वापर करून घरात प्रकाश करण्याच्या सूचना त्यांनी नागरिकांना दिल्या.
शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असताना महावितरणचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे या आंदोलनाची गरज भासल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले. यानंतरही जर महावितरणचा कारभार सुधारला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला आहे.