नवी मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी लागू केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. परंतु, अनेकांकडून या नियमांचे पालन होताना दिसत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
आतापर्यंत पालिकेने सुमारे १० लाख १४ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे. दरम्यान, नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्य संरक्षणासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महापलिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने आपल्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत रस्त्यावर थुंकणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, कोरोनाच्या प्रसारासाठी पूरक ठरणारे कृत्य करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर व दुकानांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क, रूमाल न वापरणे याकरिता ५०० रुपये, रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय अशा सार्वजनिक स्थळी थुंकणे यासाठी १ हजार रुपये, सर्व दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आदी व्यापारी तसेच त्या ठिकाणी खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांकडून शारीरिक अंतराचे बंधन न पाळणे यासाठी २०० रुपये दंड ठोठावला जात आहे. दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास दंडाची रक्कम दुप्पट व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी ३ जुलैच्या रात्रीपासून १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे व कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनची बंधने ही आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्य हितासाठी आहेत. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे. सामाजिक अंतर न राखल्यास दुकानदार, ग्राहक अशा दोघांवर कारवाई करण्यात येत आहे. वाशीच्या सेंटर वन मॉलमधील दुकानांसह ६ दुकानदारांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
.