ठाणे - मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीने पेट्रोल-डिझेल, गॅस व खाद्यतेलाच्या भरमसाठ दरवाढीविरोधात दुचाकींना 'दे धक्का' आंदोलन केले. तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
'भाजपाला जनता 2024ला सत्तेतून देणार धक्का'
'पेट्रोल-डिझेलला लागणाऱ्या क्रूड ऑइलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कमी आहेत. तरीही इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ग्रामीण भागातील मुरबाडमध्येही पेट्रोल १००.१७ रुपये, तर डिजेल ९२.३७ रुपये लिटर झाले आहे. त्यामुळे दुचाकींना 'दे धक्का' आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच महागाई कमी केली नाही तर सामान्य जनताही भाजपा सरकारला २०२४ ला सत्तेतून धक्का देणार आहे', असे चेतनसिंह पवार यांनी म्हटले आहे.
'गृहिणींच्या महिन्याचे बजेट कोलमडले'
'खाद्यतेल २२० रुपये किलो व घरगुती गॅस सिलेंडर ९०० रुपयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे', असे संध्या कदम यांनी म्हटले.
'तरुणांमध्ये संतापाची लाट'
'विशेष म्हणजे नोटाबंदी व जीएसटीमुळे कोट्यवधी रोजगार गेले आहेत. नोकरी असणाऱ्यांचे पगार मागील दोन वर्षापासून वाढले नाहीत. त्यातच पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे तरुण-तरुणींमध्ये संतापाची लाट आहे', असे गणेश देशमुख यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - ओबीसी आरक्षण प्रकरणी आघाडी सरकार विरोधात भाजपचे कृष्णा नदी पात्रात आंदोलन