नवी मुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला संपूर्ण देशभरातून तीव्र विरोध होत आहे. या कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. यासाठी आज (८ डिसेंबर) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी होणार आहे. आज संपूर्ण बाजार बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. व्यापारी व माथाडी कामगारांवरही बेकारीचे संकट ओढवेल,म्हणून हे दोन्ही घटक शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणार आहेतय
बळीराजाला साथ द्या; व्यापारी संघटनानांचे आवाहन -
देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली. बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी व्यापार करतात, माथाडी कामगार कष्टाचे काम करतात. केंद्र सरकारने केलेल्या कृषी व पणन कायद्यातील बदल व नवीन कायद्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे, तसेच माथाडी कामगारांचा रोजगारही हिरावला जाणार आहे. या कायद्यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तुर्भे येथील एपीएमसीच्या पाचही बाजारपेठांतील कामकाज मंगळवारी पूर्णत: बंद राहणार आहेत. त्यामुळे बाजार समितीतील व्यापारी, माथाडी कामगार, शेतकरी आणि इतक संबंधित घटकांनी मंगळवारच्या देशव्यापी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे.
भारत बंदला विविध पक्षांचा पाठिंबा -
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टी, तेलंगणा राष्ट्र समिती आणि महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्रात हा बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची चिन्हे आहे. यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआय, राष्ट्रीय लोकशाही पार्टी, डीएमके, आरजेडी, जेएमएम, आरएसपी या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तृणमुल काँग्रेस, कमल हासन यांच्या मक्काल निधि मय्यम या पक्षांनी देखील पाठिंबा दर्शवला असून उद्याचा बंद य़शस्वी करण्यासाठी कार्यकर्ते काम करतील.