ठाणे - शाळेच्या इमारतीवर बॅनर लावण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विद्युत तारेला स्पर्श होऊन ६ महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. आता सहा महिन्यानंतर मृत प्रमोदच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून ४ लाखांची मदत महावितरणकडून देण्यात आली आहे. प्रमोद पंडित (वय १८ ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात उल्हासनगरातील कॅम्प नंबर चार येथील गुरुनानक शाळेलगत बॅनर लावण्याचे काम सुरू होते. जुना उतरवून नवा बॅनर लावण्याच्या या कामासाठी त्याला फक्त दोनशे रुपये मिळणार होते. दोन सहाकाऱ्यांसह प्रमोद आधी जुना बॅनर खाली उतरवत होता. त्यावेळी बॅनर विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने प्रमोदला विजेचा धक्का बसला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
प्रमोद घरातील कमावता मुलगा असल्याने त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार बालाजी किणीकर व आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यांना निवेदन देऊन पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. या घटनेची ऊर्जा मंत्र्यांनी दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांची दूरध्वनीवर संपर्क करून तत्काळ मदतीचे आदेशही दिले होते.
मात्र, महावितरणकडून मृत प्रमोदच्या कुटुंबाला मदत मिळत नव्हती. त्यावेळी आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप डोंगरे आणि बालाजी किणीकर यांनी या घटनेचा सतत पाठपुरवठा केल्याने अखेर ६ महिन्यानंतर महावितरण कडून कुटुंबाला ४ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यावेळी उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित कुटुंबीयांना महावितरणचे उल्हासनगर विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार यांच्या हस्ते ४ लाखांचा धनादेश देण्यात आला.