ठाणे - जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. नवनाथ धांगडे असे या आरोपीचे नाव असून, तो हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगाबाहेर बाहेर येऊन फरार झाला होता.
श्रीनगर भागातील डोंगरावर झोपडीमध्ये नवनाथ लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-1ला मिळाली. त्याला पकडण्यासाठी पोलीस उपनरीक्षक दत्ता सरक आणि हवालदार आनंद भिलारे हे दोघे गेले. मात्र, त्याने शरणागती न पत्करता पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही पोलीस जखमी झाले. मात्र, जखमी अवस्थेत देखील त्यांनी गुन्हेगाराला सोडले नाही. जखमी पोलिसांवर वर्तकनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुन्हे शाखेने याअगोदर अनेकदा अशा प्रकारे वॉन्टेड आरोपींना पकडले आहे. यावेळीही हल्ला झालेला असतानाही जीवाची परवा न करता त्यांनी गुन्हेगारांना पकडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जखमींना भेटून त्यांची चौकशी व कौतुक केले.