ठाणे - पोलिसांच्या रेकॉडवर 'मंकी मॅन' नावाने प्रसिद्ध असलेला सराईत चोरट्याने पोलिसांना चकमा देण्यासाठी इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना भिवंडी शहरातील निजामपुरा कसाई वाडा परिसरात शुक्रवारी दुपारी घडली होती. ही घटना घडताच त्याला ताब्यात घेण्यासाठी गुजरात पोलिसांसोबत गेलेल्या भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. विशेष म्हणजे 'मंकी मॅन' सराईत चोरट्याने यापूर्वीही पोलिसांना हुलकावणी देत, इमारती व घरांच्या छतावरून ५ ते ६ वेळा पसार झाला होता. जमील उर्फ टकला कुरेशी (वय ३८ , रा. भिवंडी कसाई वाडा) असे मृत सराईत 'मंकी मॅन' चोरट्याचे नाव आहे.
'मंकी मॅन' चोरटा जागीच ठार झाल्याने परिसरात तणाव -
गुजरात राज्यातील वापी पोलीस ठाण्यात चोरी व इतर गुन्ह्यात फरार असलेला सराईत चोरटा जमील कुरेशी याच्या मुसक्या आवळाण्यासाठी गुजरात पोलीस आणि भिवंडी गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी गेले होते. त्यावेळी पोलीस आपल्या मागावर असल्याचे पाहून जमीलने नेहमीप्रमाणे पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारली. मात्र या घटनेत तो जागीच ठार झाला. त्यानंतर पोलिसांनीच जमीलला चौथ्या मजल्याच्या खिडकीतून ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला, असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पोलीस पथकांवर हल्ल्याच्या व्हिडिओ व्हायरल -
जमील जागीच ठार झाल्याचे पाहून घटनस्थळी असलेल्या जमावाने कारवाईसाठी गेलेल्या भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षिक शिंदे व त्यांच्या पथकावर अचानक जमावाने हल्ला केला. मात्र पोलिसांवर हल्ला झाला त्यावेळी हल्ल्याचे एका व्यक्तीने चित्रीकरण करीत व्हिडिओ क्लिप काढली. आता तोच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आणि केबल हातातून सटकली -
मृत सराईत 'मंकी मॅन' चोरटा यापूर्वीही पोलिसांच्या तावडीतून असाच घरातून उडी मारून तर कधी चाळीच्या पत्र्याच्या छतावरून ५ ते ६ वेळा पळ काढत होता. त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती. शुक्रवारी त्याला वाटले उडी घेतल्यानंतर टोरेंट पॉवरच्या केबलचा आपण आधार घेऊन वाचू. मात्र, उडी घेतल्यानंतर केबल हातातून सटकली आणि तो जमिनीवर कोसळला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती भिवंडी पोलिसांनी दिली आहे.
हल्लेखोर जमावाविरोधात गुन्हा दाखल -
जमील टकला ठार झाल्याचे परिसरात समजताच मोठ्या संख्येने घटनास्थळी जमाव जमा झाला. त्यावेळी घटनास्थळी जमावाने पोलीस अधिकारी/अंमलदार यांना घेरून लाथा बुक्याने व दगडाने मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 353, 341, 332, 336, 323, 504, 143, 147, 149 प्रमाणे हल्ला करणाऱ्यावर जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू आहे. सध्या या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून परिस्थिती शांत असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.