ठाणे - हॉटेलमध्ये पाणी पिण्याच्या बहाण्याने शिरलेल्या एका चोरटयाने हॉटेलच्या मालकाचा ६० हजार रु. किमतीचा मोबाईल अवघ्या काही सेंकदामध्ये लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.
पाणी पिण्याच्या बहाण्याने चोर शिरला हॉटेलमध्ये
भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात बारदिश नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक चोरटा पाणी पिण्याचे निमित्त करून हॉटेलमध्ये शिरला. त्याने पाणी पीत असतानाच मोठ्या शिताफीने समोर बसलेल्या ग्राहकाची नजर चूकवून हॉटेल मालकाचा चार्जिंगला लावलेला मोबाईल खिशात टाकला, व त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, या चोराविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.