ठाणे - मोबाईलवर बेसावधपणे बोलत असणाऱ्या व्यक्तींचा मोबाईल खेचून धूम स्टाईलने दुचाकीवरून पळ काढणाऱ्या मोबाईल चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. त्याच्याकडून चोरीचे तब्बल 12 मोबाईल आणि चोरीसाठी वापरण्यात येणारी महागडी बाईकही हस्तगत करण्यात आली आहे.
धनंजय निवृत्ती पाटील (22) असे या आरोपीचे नाव असून तो भिवंडी तालुक्यातील पडघा येथील रहिवासी आहे. रस्त्यावर किंवा गाडीवर बेसावधपणे मोबाईलवर बोलत असणाऱ्या व्यक्तींचा मोबाईल खेचून तो धूम ठोकायचा. विशेष म्हणजे या गुन्ह्यासाठी तो 200 सीसीची केटीएम या महागड्या बाईकचा वापर करत असल्याची माहिती डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली. या आरोपीकडून खडकपाडा पोलिसांनी अशाच प्रकारे चोरलेले 12 मोबाईल हस्तगत केले असून मोबाईल चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर या 8 पैकी 5 गुन्हे हे खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर उर्वरित कोळसेवाडी, रामनगर, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे आहेत.
या चोरलेल्या मोबाईलची किंमत 1 लाख 65 हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक निरीक्षक प्रितम चौधरी, पोलीस हवालदार चव्हाण, देवरे, पोलीस नाईक राजपूत, पोलीस शिपाई आहेर, कांगरे, थोरात, जाधव यांनी केली.