ठाणे - मनसेचे विभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड हा राबोडी मधलाच असून त्याला तात्काळ अटक करा, अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली. यासाठी मनसेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 'मूक धरणे' आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी, तसेच राबोडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या सोमवारी राबोडी परिसरात भर दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली होती. दरम्यान, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एका आरोपीला पकडण्यात आले असून, हत्येचे नेमके कारण काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले असून जमील शेखचा खून हा क्लस्टर विरोधातून झाला आहे. यात पालिकेच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी. या हत्येचे षडयंत्र राबोडीतच घडले असून, मुख्य सूत्रधारही तिथलाच आहे, असा आरोप जाधव यांनी केला.
हेही वाचा - ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण शेठ मुरडेश्वर यांचे कोरोनामुळे निधन