नवी मुंबई- मराठी भाषेच्या आग्रहासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आक्रमक असल्याचे वारंवार पाहण्यात येते. या बाबातचा अनुभव अॅमेझॉन सारख्या कंपनीनेही घेतला आहे. त्यानंतर मराठी भाषेवरून आणखी एक प्रकरण वाशी टोळनाक्यावर समोर आले आहे. वाशी टोल नाक्यावर कामास असलेल्या उत्तर भारतीय तरुणास मराठी का येत नाही? असा जाब विचारला जात असताना एका मराठी तरुणाने मध्यस्थी करताना राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर देत त्या टोळनाक्यावरील कर्मचाऱ्याला धडा शिकवला आहे.
काय आहे प्रकरण-
मनसे पदाधिकारी वाशी टोल नाक्यावरून आपले वाहन घेऊन जात होता. त्यावेळी वाशी नाक्यावर काम करणाऱ्या उत्तर भारतीय कर्मचाऱ्यास मराठी येत नसल्याने मनसे पदाधिकाऱ्यांने मराठीत बोलण्याचा आग्रह धरला. त्यावेळी मनसे पदाधिकाऱ्याचा टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद निर्माण झाला. त्यानंतर तिथे उपस्थित उतेकर आडनाव असलेला मराठी कर्मचारी आला व मनसे पदाधिकारी त्यांच्यात वादंग माजला. शिवाय राज साहेबांना जाऊन माझं नाव सांग, असेही वक्तव्य संबधित उतेकर या कर्मचाऱ्यांने केले. टोल नाक्यावर काम करण्यास मराठी कर्मचारी आणून द्या, असेही उत्तर टोल नाक्यावर काम करणाऱ्या उतेकर नावाच्या मराठी कर्मचाऱ्याने दिले.
मनसे कार्यालयात आणून दिला चोप-
त्यानंतर नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्या टोल नाक्यावरील उतेकर नावाच्या मराठी कर्मचाऱ्यांला शोधले, त्यानंतर मनसे मध्यवर्ती शाखेत नेऊन मारहाण केली व तसेच माफी मागण्यास लावली.टोल कर्मचारी व मनसे पदाधिकारी यांच्या वादांगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.