भिवंडी (ठाणे) - शहरात गुरुवारी तब्बल 164 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यात येथील एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या आमदारांचे खाजगी सुरक्षा रक्षक, चालक आणि सहकारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निषन्न झाले होते. त्यानंतर आमदारांनी कोरोनाची तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना मुलुंड येथील फोर्टीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
दरम्यान, गुरूवारी शहरातील 3 बाधितांचा मृत्यू झाला. तर ग्रामीण भागात 55 नवे रुग्ण आढळले आहेत. गुरूवारी शहर आणि ग्रामीण भागात एकूण 219 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे येथील एकूण रुग्णसंख्या दोन हजारांच्या वर गेली आहे. तर कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्याही शंभरच्यावर गेली आहे. भिवंडीतील शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 2 हजार 106 वर पोहचला आहे. त्यापैकी 661 रुग्ण बरे झाले आहेत. तर 101 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 344 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
भिवंडीतील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे मनपा आयुक्तांची तडकाफडकी बदली करून येथे आयएएस अधिकारी मनपा आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहेत. मात्र, वाढत्या कोरोनाबाधित रुग्णासंख्या आटोक्यात आणण्यात नवे मनपा आयुक्त डॉ. पंकज आसिया नेमकी कशी उपाययोजना करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी 134 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर तिघांचा मृत्यू
दरम्यान, भिवंडी शहरात आतापर्यंत 1 हजार 496 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 510 रुग्ण बरे झाले आहेत. तर 91 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 895 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तसेच ग्रामीण भागात आतापर्यंत 610 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 151 रुग्ण बरे झाले आहेत. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 449 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.