ठाणे - महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये कोण कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी कॅनडियन ट्रेड कॅमिशनर अखिल द्यागी यांनी स्मार्ट सिटी लिमिटेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची भेट घेतली. यावेळी कॅनडामधील विविध कंपन्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ठाणे स्मार्टसिटीच्या प्रकल्पांकरिता कसा करता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली.
हेही वाचा - ओल्या दुष्काळाची ५ मिनिटात पाहणी.. केंद्रीय पथकाला संतप्त शेतकऱ्यांनी धरले धारेवर
ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकल्पांचे कॅनडियन ट्रेड कॅमिशनर तसेच कॅनडामधील विविध तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी विविध तांत्रिक बाबी तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर सखोल चर्चा करण्यात आली. डीजी ठाणे या अत्याधुनिक डिजिटल प्रणाली, नवीन रेल्वे स्टेशन आणि सॅटीस पूर्व प्रकल्पांचे यावेळी कॅनडाच्या प्रतिनिधींकडून विशेष कौतुक करण्यात आले.
हेही वाचा - 'सरकार, कारखानदार अन् राजू शेट्टींकडूनही शेतकऱ्यांची लूट, उसाला 4 हजार दर मिळावा'
दरम्यान, हाजुरी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे प्रत्यक्ष भेट देऊन या सर्व प्रकल्पातील तंत्रज्ञानाची माहिती ट्रेड कॅमिशनर आणि कंपन्यांचे प्रतिनिधी यांना देण्यात आली. यावेळी कॅनडियन बिजनेस लॉयर लूप्सत्रा निक्सन, कॅनडाचे भारतीय समन्वयक देवरथ भाटिया, उप नगर अभियंता प्रवीण पापळकर, उप नगर अभियंता रामकृष्ण कोल्हे, नोडल अधिकारी सुधीर गायकवाड, उप अभियंता दत्ता शिंदे, मुख्य माहिती अधिकारी नितीन डुंबरे, स्मार्ट सिटीचे अधिकारी, कर्मचारी, क्रिसल, पॅलेडीअम व फॉक्सबॅरीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.