नवी मुंबई - कौटुंबिक वादातून नवी मुंबईतील ऐरोलीत निवृत्त पोलीस असलेल्या पित्याने पोटच्या दोन मुलांवर गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली होती. यानंतर आरोपीला रबाळे पोलिसांनी अटक केली. मात्र, जखमी दोन मुलांपैकी एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबई शहरात खळबळ उडाली आहे.
कौटुंबिक वादातून पित्याचा मुलांवर गोळीबार -
ऐरोली सेक्टर ३ येथील भोस्कर भवन शेजारी धरम जीवन या रो हाऊस मधील निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी आपल्या राहत्या घरी त्यांच्या २ मुलांवर रिव्हॉल्वरच्या सहाय्याने ३ वेळा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. गोळी झाडणारा पिता भगवान पाटील (७०) हा नवी मुंबईतील निवृत्त पोलीस कर्मचारी आहे. कौटुंबिक वाद झाला त्याचे पर्यावसन भांडणात झाले व परवानाधारक रिव्हॉल्वर मधून भगवान पाटील याने दोन्ही मुलांच्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या. यामध्ये मुलगा विजय याला २ गोळ्या लागल्या तर दुसरा मुलगा विजय याच्या कंबरेला गोळी घासून गेली. विजय याला इंद्रावती रुग्णालयात दाखल केले होते.
उपचारादरम्यान विजयचा मृत्यू -
दोन गोळ्या लागल्याने विजयची अवस्था गंभीर होती. मात्र, अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गिफ्ट देण्याचं सांगून मुलाला बोलावलं घरी -
विजय हा वसई येथे आपल्या पत्नीसह राहत होता. तुला गिफ्ट देतो, असे सांगून त्याला आरोपीने घरी बोलावले होते. मात्र, इथे आल्यानंतर कौटुंबिक वाद झाला. या वादातून वडिलांनी विजय व त्याच्या भावावर गोळी झाडली व स्वतःच्या पत्नीला देखील मारहाण केली. विजयला दोन गोळ्या लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.