ठाणे - घटस्फोट दिल्यानंतरही चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कात्रीने वार केल्याची घटना घडली. भिवंडीतील नेहरूनगर परिसरातील नवीवस्ती येथे हा प्रकार घडला. जखमी महिलेवर स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कासीम सायेब पटेल (३२ रा.नेहरूनगर) या हल्लेखोर पतीला भिवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी कासीम हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. याच कारणावरून कासीम व त्याच्या पत्नीचा घटस्फोट( तलाक ) देखील झाला होता. त्यामुळे त्याची पत्नी तिच्या आईच्या घरी राहत होती. आरोपी कासीम हा मंगळवारी पीडित पत्नीच्या माहेरी गेला. 'तू माझी झाली नाहीस, तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही', असे बोलून शिलाई मशीनवर ठेवलेल्या लोखंडी कात्रीने तिच्या छातीवर, हातावर, मानेवर आणि डोक्यावर वार केले.
हेही वाचा - सोशल मीडियावर भन्नाट मीम्स... मी पुन्हा येईन वरुन फडणवीस ट्रोल तर पवारच चाणक्य
या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिलेची आई आएशा कादीर शेख हिने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात कासीमच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील करत आहेत.