ठाणे - आपल्या पुढे मोठे आव्हान असून देशाचे चौकीदार मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, असे भाजपच्या फाईल चोर नगरसवेकाने म्हटले आहे. उल्हासनगरमध्ये आयोजित केलेल्या युतीच्या मेळाव्यात व्यासपीठावरून ते कार्यकत्यांना उपदेश देत होते. त्यांनी असे बोलताच युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच हश्या पिकला होता. विशेष म्हणजे या महाशयांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली होती. प्रदीप रामचंदनी असे त्या भाजपच्या स्वीकृत नगरसेवकाचे नाव आहे.
उल्हासनगर महापालिकेतील भाजपचे नगरसवेक प्रदीप रामचंदानी हे मे २०१८ मध्ये महापालिका मुख्यालयातील बांधकाम विभागातून एका फाईल चोरीप्रकरणी कारावास भोगून जामिनावर बाहेर आले. त्यांच्या चोरीचा प्रकार कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावरून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा २ वेळा जामीन नामंजूर केला. त्यामुळे त्यांना जेलवारीही करावी लागली होती.
पारदर्शक कारभार आणि ‘ना खाऊगां ना खाने दुंगा’ चा नारा लगावत मोदींनी सत्ता काबीज केली. एकीकडे देशभरात लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्ष यांनी ‘चौकीदार’ या शब्दावर जोर देवून चौकीदार हा प्रामाणिक कसा असतो हे मोदींनी दाखवून दिल्याचे सांगतात. तर दुसरीकडे काँग्रेससह आघाडीतील नेते चौकीदारच चोर असल्याचा प्रचार करताना दिसत आहे. यामुळे फाईल चोरीच्या प्रकरणात जेलवारी करून आलेले भाजपचे चौकीदार नगरसेवक प्रदीप रामचंदनी हेच शिवसेना-भाजप युतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचार करताना दिसत आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील मतदारांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.