ठाणे - मकर संक्रांती ही अशुभ असते, असा आपल्याकडे समज आहे. सूर्याने मकर राशीत प्रवेश केला, की दिनमान वाढत जाते. दिनमान वाढत जाणे हे अशुभ किंवा वाईट कसे असू शकेल? असा प्रश्न उपस्थित करून खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी मकर संक्रांती सणाचे महत्त्व पटवून दिले आहे.
सूर्याने २२ डिसेंबर २०१९ ला सायन मकर राशीत प्रवेश केला. या दिवशी उत्तरायण सुरू झाले. त्यादिवसापासून दिवस १० तास ५८ मिनिटांचा आणि रात्र मोठी म्हणजेच १३ तास ०२ मिनिटांची होते. यावर्षी १४ जानेवारी २०२० ला उत्तररात्री २ वाजून ८ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करत आहे.
हेही वाचा - बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; दोन हजार रुपयात करता येणार बुकिंग
मकर संक्रांतीचा सण १४ जानेवारीलाच का येतो? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. मकरसंक्रांतीचा सण हा इंग्रजी तारखेवर अवलंबून नाही. हा सण सूर्य निरयन मकर राशीत सूर्य प्रवेश कधी करतो त्यावर अवलंबून असतो. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस, ६ तास, ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरीयन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकाला चारशेनी भाग जात नसेल, तर ते लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस ३ दिवसांनी पुढे जातो, असे त्यांनी सांगितले.
सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला येत होती. सन १८९९ मध्ये निरयन मकर संक्रांत १३ जानेवारीला आली होती. सन १९७२ पर्यंत निरयन मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांत कधी १४ जानेवारीला, तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल. अशा रितीने पुढे जात सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती १ फेब्रुवारीला येणार आहे. यावरून लक्षात येईल की, मकर संक्रांती फक्त १४ जानेवारीलाच येत नाही.
काळ्या रंगाचे वस्त्र
मकरसंक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. काळा रंग हा अशुभ नाही. सौभाग्य लेणे मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे.
थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी असतात. म्हणून तीळ-गूळ देण्याची प्रथा पडली आहे. वर्षभरात कुणाशी भांडणे झाली असतील, तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ देऊन ‘क्षमा करुया आणि विसरून जाऊया' हा संदेश देण्याची प्रथा आहे.