ठाणे : शहरामध्ये गुन्हेगारी वाढली आहे. तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे राज्यात गुंडांचे सरकार महाराष्ट्रात राहू देणार नाही, अशी घोषणा देत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरें यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चात सरकारला इशारा दिला आहे. ठाण्यात रोशनी शिंदे यांच्या मारहाणीच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे आज महामोर्चा काढण्यात आला आहे.
आघाडीतर्फे मोर्चा : कालच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात शिंदे यांची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली होती. त्याचवेळी त्यांनी आज महामार्चो काढणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला आहे. त्यामध्ये युवानेते आदित्य ठाकरे ठाण्यातल्या सहभागी झाले आहेत. यावेळी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलीस कुचकामी तपास करत असल्याचा आरोप करुन त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याच मुद्यावरून आज महाविकास आघाडीतर्फे ठाण्यात मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी पोलिसांच्या कुचकामी कारभारावर प्रश्न विचारून पोलीस आयुक्तालयाला टाळे ठोकणार असल्याचे सांगण्यात आले.
रोशनी शिंदेंना न्याय मिळाला पाहिजे : राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद परांजपे यांनी यावेळी पोलिसांच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी रोशनी शिंदे यांना न्याय मिळाला पाहिजे असे सांगितले. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरही प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. गुंडाचे सरकार महाराष्ट्रात राहू देणार नाही असा निर्धार यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवला.
राष्ट्रवादी काँग्रेसही ठाण्यात आक्रमक : आधीच विविध गुन्ह्यांच्यामुळे हैराण असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडही यावेळी आक्रमक झालेले दिसते. त्यांनी न्यायासाठी हा मोर्चा काढल्याचे स्पष्ट केले. इथे नेहमीच कायदा पायदळी तुडवला जात आहे. त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. पोलीसच कायदा पाळत नसतील तर जनतेचे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पोलीस एकांगी कारभार करत आहेत. काहींच्या विरोधात आकसाने पोलिसांच्याकडून कारवाई होत आहे.