ठाणे - महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. असा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने भिवंडीत सुरू करण्यात आलेल्या 'नारीशक्ती गारमेंट्स' युनिटच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
'नारीशक्ती गारमेंट्स'च्या माध्यमातून महिलांना रोजगार
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने भिवंडी येथे 'नारीशक्ती गारमेंट्स'च्या तिसऱ्या युनिटचे उद्घाटन महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते करण्यात आले. आतापर्यंत अशा विविध माध्यमातून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अनेक महिलांना रोजगार मिळून देण्यात आला आहे. कापडाचे मॅचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीत सध्या कापडाचा व्यावसाय डबघाईला आला आहे. मात्र संस्थेने सुरू केलेले हे कापड युनिट येणाऱ्या काळात कापड उद्योगाला नवी झळाळी देण्यासाठी उपयोग ठरेल. या माध्यमातून महिलांना रोजगार मिळून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा विश्वास आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच सध्या महामंडळाच्या वतीने 450 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी महिला मेळाव्यासह इतर कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.