ठाणे - उल्हासनगर महानगरपालिका परिवहन समिती सभापतीपदी महाविकास आघाडीचे दिनेश लहारानी यांनी बाजी मारली आहे. लहारानी यांनी भारतीय जनता पक्षाच्या शंकर दावानी यांचा पराभव केला. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी तात्काळ चिट्टी उडवून शिवसेनेचे दिनेश लहरानी हे विजय झाल्याचे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीकडे नशिबाने परिवहन समिती सभापतीपद मिळाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
महानगरपालिकेत आज (शनिवारी) परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली. निवडणुकीत भाजपचे शंकर दावानी तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दिनेश लहरानी यांच्यात लढत झाली. शंकर दावानी हे राष्ट्रवादीकडून परिवहन सदस्य झाले होते. मात्र, त्यांनी भाजपात प्रवेश करून सभापती पदाच्या रिंगणात उतरले. निवडणुकीत ७ विरुद्ध ६ मतांनी निवडणूक होणार होती. मात्र, भाजपचा एक सदस्य राज कुमार सिंग हे गैरहजर राहिल्याने दोन्ही पक्षांना समान मते पडली. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी तात्काळ चिट्टी उडवून महाविकास आघाडीचे दिनेश लहरानी हे विजय झाल्याचे सांगितले.
हेही वाचा - केंद्र सरकारने थकविली ईसीएचएसची रक्कम; रुग्णालये थांबविणार विनारोकड सेवा
विशेष म्हणजे, उल्हासनगर शहरात मागील 5 वर्षांपासून परिवहन सेवा ठप्प आहे. तरीदेखील सदस्यांना पालिकेच्या तिजोरीतून मानधन दिले जात आहे. अशा प्रकारे जर जनतेच्या पैशाची लूट होत असेल तर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून ही समिती बरखास्त करावी अशी मागणी करदात्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.