ठाणे - सरकारी कर्मचारी लोकल पकडण्यासाठी आले असता त्यांना लोकलच्या पासेस आणि तिकिटांसाठी तासन् तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. तिकिटांच्या खिडक्या अतिशय मर्यादित उघडल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच तिकिटांसाठी सुरक्षित अंतर ठेवून कसे उभे राहायचे? यासाठी देखील मार्किंग न केल्याने लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे फजिकल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्व व्यवस्था मूळ पदावर येण्यासाठी आणखी बराच वेळ वाट पाहावी लागेल, अशी चिन्हे दिसत असताना सोमवारपासून मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे. ही लोकलसेवा मुंबईच्या मध्य आणि पश्चिम मार्गावर धावणार असून, यात केवळ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. इतर प्रवाशांनी गाडीतून जाण्यासाठी गर्दी करू नये, म्हणून काल पहिल्याच दिवशी रेल्वेस्थानकात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. मात्र, काल गाड्या अनियमित धावत असल्याने बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केली होती. आज देखील सरकारी कर्मचारी लोकल पकडण्यासाठी आले असता असुरक्षित वातावरणात त्यांनी तिकिटांच्या रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळे त्यांना कामावर जाण्यास देखील उशीर झाला. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात सोमवारीच चार हजारांच्या पार कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १० हजारांच्या वर पोहोचली आहे. त्यात फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी रेल्वे स्थानकावर कुठलीही खबरदारी घेतली नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लोकल सुरू करताना राज्य सरकार आणि रेल्वेने आधीच प्लॅनिंग करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे प्रवासी कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, आज कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला.