ठाणे - गेल्या निवडणुकीत मोदी लाट असल्याने ते मोदी लाटेमध्ये निवडून आले होते. मात्र, आपण आपल्या वाटेने चाललो असून या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. असा विश्वास कल्याण लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे. कल्याण पश्चिमेत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
आता मोदी लाट नाही आहे, त्यामुळे घाबरायची गरज नाही. इकडेही बरेच मातब्बर नेते असताना कार्यकर्त्यांनी स्थानिक भूमीपुत्राची मागणी केल्याने आपल्याला उमेदवारी मिळाली. आपण ३३ हजार महिला बचत गटांशी जोडलेलो आहोत. गेली ५ वर्षे आपण काय भोगले आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामूळे येणाऱ्या २९ तारखेला मतदार मतदानातून आपला राग दाखवतील आणि आपण १ लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ, असा विश्वास बाबाजी पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
तब्बल ३६ वर्षांनंतर स्थानिक भूमिपुत्राला संधी -
पूर्वीचा ठाणे व आताचा कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना-भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. १९८२ पूर्वी येथून लोकसभेसाठी भाजपाचे रामभाऊ म्हाळगी निवडून येत होते. म्हाळगी यांच्या निधनानंतर १९८२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाचे जगन्नाथ पाटील निवडून आले होते. पाटील हे आगरी समाजाचे ठाणे जिल्ह्यातील पहिले खासदार ठरले होते. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शांताराम घोलप यांनी भाजपाचे जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला होता. ५ वर्षांनतर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या राम कापसे यांनी काँग्रेसचे घोलप यांचा पराभव केला होता.
त्यामुळे ९० च्या दशकात घोलप व पाटील या दोन भूमिपुत्रांना खासदार म्हणून अल्पकाळ का होईना दिल्लीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर ठाणे आणि कल्याण असे २ लोकसभा मतदारसंघ झाले. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या २००९ मधील पहिल्या निवडणुकीत सेनेचे आनंद परांजपे पुन्हा निवडून आले होते. एकंदरीत सुमारे ३० वर्षांपेक्षा अधिक काळ कापसे आणि परांजपे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सेनेच्या आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी नवख्या असलेल्या सेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोदी लाटेत राष्ट्रवादीचे परांजपे यांचा पराभव केला.
या मतदारसंघात सुमारे १५० पेक्षा अधिक गावपाडे आहेत. त्या गावांमध्ये भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाची संख्या लक्षणीय आहे. सहापैकी २ आमदार आगरी समाजाचे आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका येथे आगरी-कोळी समाजाचे नगरसेवकदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाला दिल्लीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, अशी हाक देण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात भूमिपुत्र असलेला हाच आगरी-कोळी समाज विविध पक्षांत विखुरला असल्याने निवडणुकीत जातीचे कार्ड किती चालेल? हे निवडणूकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.