ठाणे - महाराष्ट्र शासनाने आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची योग्य सोय व्हावी म्हणून महाराष्ट्रभर आदिवासी वस्तीगृह उभारली. मात्र या वस्तीगृहात भयानक परिस्थिती पाहायला मिळत आहे. मुरबाडमधील आदिवासी शासकीय वस्तीगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात मेलेली पाल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुरबाड शहरातील म्हसा रोडवर असलेल्या आदिवासी शासकीय वस्तीगृह असून या ठिकाणी काल रात्रीच्या सुमारास आदिवासी मुलांच्या जेवणात मेलेली पाल आढळून आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लगेचच जेवण बाजूला सारून मुरबाड ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आणि विषबाधा होऊ नये म्हणून प्राथमिक उपचार केले. सुदैवाने त्यावेळी जेवणासाठी बसलेल्या १५ ते १६ मुलाना विषबाधा होता होता वाचली.
या घटनेच्यावेळी वसतीगृहात अधिकारी आणि शिपाई उपस्थित नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करून या घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नसल्याने या घटनेची अधिक माहिती कळू शकली नाही.
दुर्गम भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे जर असे हाल होणार असतील आणि त्यांच्या जीवाशी खेळ केला जात असेल तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थितीत झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुरबाड मधील मनसैनिकांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली आणि येथील अधिकाऱ्यांना जाब विचारात त्यांना धारेवर धरले होते.